PCMC तहलका न्यूज 312 29-08-2020 15:32:29
शरद गोविंदराव पवार (डिसेंबर १२, इ.स. १९४० - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.[१] शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. [२] बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री श्री. अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.