राज देशमुख
मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2009 दरम्यान आणि त्यानंतर 2009 ते 2014 दरम्यान दोन वेळा पंतप्रधानपद भूषवलं. त्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी पीव्ही नरसिंम्हा राव हे पंतप्रधान असताना देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं होतं.
2018 साली मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सिंग यांनी त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची माहिती दिली होती. आपल्या नावावर किती घरं आहेत कोणकोणती संपत्ती आहे याचा तपशील त्यांनी दिलेला.
मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती 15 कोटी 77 लाख रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच दिल्ली आणि चंदीगडमध्ये आपल्या नावावर फ्लॅट्स असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
विशेष म्हणजे मनमोहन सिंग यांनी आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं जाहीर केलं होतं. यावरुनच मनमोहन सिंग यांचं अर्थमंत्री म्हणून नियोजन जितकं अचूक होतं तितकेच ते वैयक्तिक स्तरावरही उत्तम आर्थिक व्यवस्थापन करायचे हे स्पष्ट होतं. 2018-19 साली मनमोहन सिंग यांची एकूण कमाई 90 लाख रुपये इतकी होती. याचबरोबर त्यांच्या नावावर घरं आणि बँक खात्यांवर काही रक्कमही होती. 2013 मध्ये मनमोहन सिंग यांच्या एसबीआयच्या खात्यावर 3.46 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावर कोणतेही कर्ज नसल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळेस त्यांच्याकडे 30 हजार रुपयांची रोख रक्कम होती. अनेक सरकारी गाड्या मनमोहन सिंग यांच्या सेवेत होत्या. मात्र मनमोहन सिंग यांच्याकडे 1996 सालाचं मॉडेल असलेली मारुती 800 कार होती. त्यांच्या नावावर असलेलं हे एकमेव वाहन होतं.