आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Maharashtra Government: जमिनीचा मालक कोण, हे आता सरकार ठरवणार! महाराष्ट्रात येणार 'लँड टायटलिंग ॲक्ट';

शरद लाटे  207   28-11-2026 09:00:33

Pune 

जमीन तुमची आहे, त्यामुळे तिचा मालकी हक्क तुम्हालाच सिद्ध करावा लागतो; परंतु हे लवकरच बदलणार आहे. जमीन कोणाची आहे, हे आता सरकार सांगणार आहे. त्यासाठी 'जमीन मालकी हक्क कायदा' (महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यासाठीचे विधेयक तयार झाले असून हिवाळी अधिवेशनात ते मांडले जाण्याची शक्यता आहे.

विधेयकामुळे प्रत्येकाच्या जमिनीचे मालकी हक्क अधिकृत व सुरक्षित होणार आहेत. त्याचसोबत जमिनींच्या व्यवहारातील गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे. जमिनीचा मालक कोण आहे, हे राज्य सरकारच सांगणार आहे. जमिनीची अचूक नोंदणी करणे, मालमत्तेची बेकायदा होणारी विक्री रोखणे व मूळ मालकाचा हक्क आश्‍वासित करण्यासाठी जमीन मालकी हक्क कायदा विधेयक तयार करण्यास २०१४ पासून सुरुवात झाली.

त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने हे विधेयक तयार करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविले होते. त्यावर महसूल, विधी व न्याय विभागाने काही त्रुटी काढून दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने विधेयकामध्ये दुरुस्त्या करून ते अंतिम केले आहे. आता ते राज्य सरकारकडे पाठविले असून शासनाच्या पातळीवर अंतिम करण्यात आले आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले हे विधेयक अस्तित्वात येण्याची शक्यता अधिक असल्याचे भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. विधेयकाच्या वृत्तास महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

अनेक सुधारणा प्रस्तावित

देशात सर्व्हे क्रमांकानुसार सध्या जमिनीचा प्रकार, क्षेत्र, स्थान अशी नोंद होते. मात्र इमारती व सदनिकांची अचूक नोंद होण्यासाठी या विधेयकामध्ये तरतुदी केल्या आहेत. ज्यामुळे खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. तसेच मालमत्ता हस्तांतर, खरेदी-विक्रीचे व्यवहार करतेवेळी न्यायालयीन दाव्यांबाबत माहिती देणे या दुरुस्तीनंतर आवश्‍यक होणार आहे. अनेक सुधारणा जमीनविषयक विधेयकात प्रस्तावित केल्या आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.