आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, आता मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो'; विवेकानंद पाटलांची सरकारवर जोरदार टीका

शरद लाटे  175   09-11-2026 14:40:13

Pune 

शासकीय संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील भाषणांमुळे चर्चेत आलेले विवेकानंद पाटीलही सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत महायुती सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली.

भाषणादरम्यान विवेकानंद पाटील यांनी एका गाण्याचा संदर्भ देत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आपल्याकडे एक गाणं आहे, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो आणि मथुरेत कंस मामा बोटं मोडितो. पण आता काळ बदलला आहे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो आणि मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो, अशी सध्याची परिस्थिती आहे." या शब्दांत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

या मोर्चात सहभागी होण्याबाबत अनेकांनी आपल्याला विचारणा केली होती, असे सांगत विवेकानंद पाटील म्हणाले की, आपण काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपचा कार्यकर्ता म्हणून या मोर्चात आलेलो नाही. तर एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपली भूमिका मांडण्यासाठी आलो आहोत.

गेल्या १० ते १५ दिवसांपासून गोकुळमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष संपूर्ण राज्य पाहत आहे. आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नसून कोल्हापूरच्या जनतेने सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमत दिले आहे. त्यामुळे गोकुळचे अध्यक्षपदही त्यांच्याच गटाकडे असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित संस्था असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना विवेकानंद पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना माझं इतकंच सांगणं आहे की, आमच्या म्हशीही तुम्हाला गोकुळची सत्ता मिळावी म्हणून फळत नाहीत. आमची म्हैस फळते ती आपल्या धन्याला दूध मिळावं म्हणून."

गोकुळमधील सत्तास्थापनेचा पेच सोडवायचा असेल, तर शासननियुक्त सदस्यांना गणपूर्तीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी; मात्र त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी विवेकानंद पाटील यांनी केली. नामनिर्देशित संचालकांना मतदानाचा अधिकार देणे हा दूध उत्पादकांवर सरळसरळ अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.

दूध उत्पादनासाठी शेतकरी कुटुंबांना करावी लागणारी मेहनत अधोरेखित करत त्यांनी महिलांच्या कष्टांचाही उल्लेख केला. "सकाळी अंधारात उठून आमच्या बायांनी दुधाच्या धारा काढायच्या. शेण-घाण काढून त्यांच्या हातांची अवस्था खराब झाली आहे. नामनिर्देशित संचालकांच्या घरातील महिलांना धार काढताना मला दाखवा," असे आव्हान त्यांनी दिले.

सहकार क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसलेले काही लोक केवळ कागदोपत्री सहकार समजतात, अशी टीकाही त्यांनी केली. गोकुळमधील निर्णयप्रक्रियेत दूध उत्पादकांच्या कष्टांना आणि त्यांच्या मतदानातून व्यक्त झालेल्या जनमताला महत्त्व दिले पाहिजे, अशी भूमिका विवेकानंद पाटील यांनी संघर्ष मोर्चात मांडली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.