दिवाळीच्या सणात गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य; निळकंठेश्वराच्या पायथ्याशी सामाजिक बांधिलकीचे दर्शन
पुणे : दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून पुणे येथील केअर टेकर्स संस्थेच्या वतीने निळकंठेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या जांभली, डावजे आणि बहुली येथील आदिवासी कातकरी समाजातील १५० कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.
यंदा शासनाकडून आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांसमोर निर्माण झाला होता. या कुटुंबांची अडचण लक्षात घेऊन केअर टेकर्स संस्थेने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला.
या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली. विशेषतः शिधा मिळाल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा या उपक्रमाचा सर्वात मोठा आनंद ठरला.
यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विधानसभा प्रमुख नितीनदादा वाघ यांनी केअर टेकर्स ग्रुपच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले. केअर टेकर्स ग्रुप नेहमीच समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी सामाजिक योगदान देत आला आहे. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आपण सातत्याने करत असलेल्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांनी संस्थेतील सर्व सदस्यांचे विशेष आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, सहकार्य आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते, असेही त्यांनी नमूद केले.
या सामाजिक उपक्रमासाठी विष्णू दोशी, नरेश गुप्ता, नामदेव थिगळे, डॉ. वैष्णवी थिगळे, ऋषिकेश पवार, संजय पत्रे, वर्षाताई शिंदे, सपना वहिनी परदेशी तसेच होप फाउंडेशनच्या सुरेखाताई आगरवाल यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे, मनीषा बोरसे, आदिती सोनवणे, अरिफ पटेल, गणेश चित्ते, अमोल अरगडे, रणजित मामा परदेशी, विजय बेलीटकर, अली सय्यद, वैभव लाड, वरद लाड, सौरभ मोकाशी, पप्पू गायकवाड, दत्ता तावरे, नथू मळेकर, राकेश तावरे, रितेश गायकवाड, माऊली भगत, पंचायत समिती सदस्य नितीन वाघ आणि मनोज हडवळे यांनी परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या दिवाळीत आनंदाची भर घालणारा केअर टेकर्स संस्थेचा हा उपक्रम माणुसकीचे दर्शन घडवणारा ठरला.