Pune पिंपरी : निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे २५ एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाला प्रभाग क्रमांक १५ मधील चारही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.
दाट लोकवस्ती आणि परिसरातील पर्यटनस्थळांचा विचार करून हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रस्तावित जागेच्या आसपास दुर्गादेवी टेकडी, आप्पूघर, निगडी जलशुद्धीकरण केंद्र आणि रावेत परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. कचऱ्याची वाहतूक, साठवणूक आणि दहन प्रक्रियेमुळे दुर्गंधी, वायुप्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. तसेच, कचरा वर्गीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत नसल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या परिसरात यापूर्वी एन्व्हायर्नमेंट सेंटर, सेंट्रल पार्क आणि अर्बन फॉरेस्ट विकसित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि जीवनमान लक्षात घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घ्यावा. लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावर असलेल्या पर्यायी जागेवर हा प्रकल्प उभारण्याबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ आणि नगरसेविका शैलजा मोरे यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे निगडी प्राधिकरणासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.