Pune
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune Expressway) प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी बहुचर्चित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नवीन मार्गावर वाहनांसाठी नवे वाहतूक नियम जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाकडून 26 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, येत्या 1 नोव्हेंबर पासून या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
बोगद्यांमधील तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai Pune Missing Link Speed Limit : कार अन् बससाठी 'इतकी' वेगमर्यादा
वाहतूक विभागाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, मिसिंग लिंकवर वाहनांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे.
कार व हलकी खासगी वाहने: ताशी 100 किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
प्रवासी बस: ताशी 80 किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Missing Link No Entry Vehicles : अवजड वाहनांना मिसिंग लिंकवर पूर्णबंदी
या प्रकल्पातील सुरक्षेचा विचार करता मालवाहू वाहनांना झटका बसला आहे. यापूर्वी परवानगी असलेल्या पिकअप व्हॅन आणि टाटा एस यांसारख्या हलक्या मालवाहू वाहनांसह (LCV) आता सर्वच प्रकारच्या लहान-मोठ्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर बंदी असेल.
Missing Link Freight Vehicles Route : मालवाहू वाहनांसाठी हा असेल पर्यायी मार्ग
मिसिंग लिंकवर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आल्यामुळे, या वाहनांना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या मूळ जुन्या मार्गिकेचाच वापर करावा लागणार आहे. बोगद्यातील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.