आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Cotton Price: कापसाचे दर प्रति क्विंटल ९५०० रुपयांवर

शरद लाटे  98   26-10-2026 10:53:59

Pune 

खासगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल ९५०० रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापारी खरेदीसाठी उत्सूक असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जिल्ह्यात १९ खरेदी केंद्रांचे नियोजन केले आहे.

मात्र खासगी बाजारातील दरामुळे शेतकऱ्यांचा कल खासगी विक्रीकडे असल्याचे चित्र आहे.

यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा, मारेगाव आणि घाटंजी या भागांत कापूस खरेदीची लगबग सुरू आहे. राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक खरेदी होते.

येथे मागील हंगामात सुमारे १० लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यंदाही खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीसाठी उत्सुकता दाखविली जात आहे. कापसाला ९५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी खासगी बाजाराला पसंती देत आहेत.

सीसीआय'ने कापूस खरेदीसाठी आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, कळंब, महागाव, मारेगाव, नेर, पुसद, राळेगाव, खैरी, बाभूळगाव आणि वणी यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण १९ खरेदी केंद्रांचे नियोजन केले आहे.

खासगी बाजारात चांगला दर मिळत असल्याने 'सीसीआय'च्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी किती होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, खासगी बाजारातील दर आणि सीसीआयचा हमीभाव यांतील तफावत कापूस विक्रीचा निर्णय घेताना महत्त्वाची ठरणार आहे. यंदा उत्पादनातील घट आणि बाजारातील आवक यानुसार पुढील काळातील दरांची दिशा ठरेल.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.