Pune
सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना महाराष्ट्रातील भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात विशेष मोहीम राबवली जात असून, आतापर्यंत १६.९२ कोटी रुपयांचा संशयास्पद व भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत एफडीएने ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत, तर नियमभंग करणाऱ्या ७ उत्पादन युनिट्सना थेट टाळे ठोकले आहे.
२२ गुन्हे दाखल, २० जणांना अटक
News 18 च्या वृत्तानुसार, दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, गोडेतेल, सुकामेवा आणि फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहा विभागांमध्ये एफडीएने तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान ८,३९२ किलो मुदत संपलेला आणि खराब झालेला अन्नसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात २२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २० जणांना अटक करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवात ९.११ कोटींचा अन्नसाठा जप्त
याआधी पार पडलेल्या नवरात्रोत्सवात एफडीएने तब्बल ९.११ कोटी रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त केला होता. याशिवाय राज्यभरात बंदी असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातही धडक कारवाई करत ३.१५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विभागनिहाय कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे ४.१९ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. फेकून दिलेला किंवा खराब झालेला माल पुन्हा बाजारात आणल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.
सोलापुरात १,३३७ किलो भेसळयुक्त खवा जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागातील एफडीए पथकाने पुणे-पंढरपूर रस्त्यावर माळशिरस जवळ एका वाहनावर (MH 25 AJ 4023) छापा टाकला. धाराशिव जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या उत्पादकांकडून तयार केलेला १,३३७ किलो खवा या वाहनातून सातारा येथील घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांकडे पाठवला जात होता.
योग्य ती खबरदारी न घेता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून हा खवा वाहतूक केला जात असल्याचे तपासणीत उघड झाले. खवा हा नाशवंत पदार्थ असल्याने आणि भेसळीचा संशय असल्याने अंदाजे ४.८१ लाख रुपये किमतीचा हा संपूर्ण साठा खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आला.