Pune
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रिसॉर्टच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा राजगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. वेळू येथील आमराई रिसॉर्टवर छापा टाकून पोलिसांनी १३ महिलांची सुटका केली.
या प्रकरणी वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयित रघु शेट्टी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळू येथील आमराई रिसॉर्टमध्ये मागील दोन महिन्यांपासून महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची माहिती घेतली. त्यानंतर रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. यावेळी महिलांकडून एक हजार रुपयांच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिसॉर्टची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी तेथून १३ महिलांची सुटका केली. या महिलांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत या व्यवसायात आणण्यात आले, त्यांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी सुटका केलेल्या १३ महिलांमध्ये मुंबई, ठाणे, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक येथील महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांना नोकरीचे किंवा पैशांचे आमिष दाखवून रिसॉर्टमध्ये आणण्यात आले होते का, तसेच या प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.