आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Bacchu Kadu: भाजपच्या लोकांची ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंकडे पोहोचली, बच्चू कडूंना भलताच संशय;

शरद लाटे  113   25-10-2026 11:22:41

Pune 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, आणि 'झारीतल्या शुक्राचार्या'ला शोधून काढावे,' अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

कडू यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. 'या प्रकरणामागे मोठे राजकीय कारस्थान असल्याचा मला संशय आहे. एका कार्यालयातील कारकुनामार्फत ही अत्यंत गोपनीय ऑडिओ क्लिप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवली गेली असावी, अशी शक्यता आहे. महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून ही क्लिप पूर्ण ऐकली पाहिजे आणि या पडद्यामागील सूत्रधाराला म्हणजेच 'झारीतील शुक्राचार्या'ला शोधून काढले पाहिजे. ऐन निवडणुकांच्या आणि राजकीय घडामोडींच्या काळात ही संभाषणे का बाहेर काढली गेली, याचा शोध घेणे गरजेचे आहे,' असे कडू म्हणाले.

​'सध्या राज्यात दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत केवळ बदनामीचे आणि ऑडिओ क्लिपचे राजकारण खेळण्याऐवजी, सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,​' असा सल्लाही ​कडू यांनी दिला.

क्लिपचा मुळापासून तपास केला पाहिजे; मनोज जरांगे यांचे फडणवीस, शिंदे यांना आवाहन

'ऑडिओ क्लिप ओरिजनल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याकडे लक्ष द्यावे,' अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी केली. जालन्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते. 'जर फडणवीस यांना अंधारात ठेवून अशी षड्यंत्रे सुरू असतील, तर भाजपला धोका आहे. तरीही फडणवीस निःपक्षपणे चौकशी करतील, असा विश्वास आहे. मात्र, ज्यांनी आपल्याला ही क्लिप दिली त्या व्यक्तीला पूर्ण संरक्षण देण्याची हमी फडणवीस आणि शिंदे यांनी दिली, तरच ही क्लिप पोलिसांकडे देऊ,' असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम यांच्याकडेही हीच क्लिप असल्याचा दावा जरांगे यांनी केला. 'कदम यांनीच आपल्या आधी ही क्लिप जाहीर केली. या क्लिपमध्ये कोण बोलत आहे, त्यांची नावेही त्यांनी सांगितली. क्लिप कधी रेकॉर्ड झाली याची तारीखही त्यांना माहिती आहे. त्यामुळे ती क्लिप त्यांच्याकडून घ्यावी आणि त्यांचीही चौकशी व्हावी,' अशी मागणी त्यांनी केली.

'पंधरा दिवस आपण काही बोलणार नाही. त्यानंतर पाहू; मात्र शिंदे गप्प बसणार नाहीत आणि भाजपने पैसे दिले असतील, तर तेही गप्प बसणार नाहीत. हा विषय आपण सोडणार नाही,' असेही जरांगे म्हणाले.

क्लिपबाबत राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांत आपल्याला रस नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. 'ते सगळे एकमेकांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागे षड्यंत्र रचून खोट्या बातम्या पसरवतात,' असा आरोप त्यांनी केला. आपली सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा दावा करून 'आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो,' अशी भीतीही जरांगे यांनी व्यक्त केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.