आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Suresh Dhas : "अण्णा, आमच्या लग्नाचं बघा; नोकरी लागेपर्यंत मानधन द्या!"; महायुतीच्या प्रचारसभेत पदवीधर तरुणाची आमदार सुरेश धसांकडे साद..!

शरद लाटे  34   22-10-2026 17:13:45

Pune 

अनेक परीक्षा दिल्या, वयाची तिशी उलटली तरी हाताला नोकरी नाही. नोकरी नसल्याने लग्नही जमत नाही. त्यामुळे अण्णा, एकतर आमच्या लग्नाचं बघा, नाहीतर लग्न होईपर्यंत दरमहा मानधन द्या," अशी भावनिक साद आष्टी येथील प्रचारसभेत एका उच्चशिक्षित पदवीधर तरुणाने थेट व्यासपीठावरून आमदार सुरेश धस यांच्याकडे घातली.

महायुतीच्या प्रचारसभेत तरुणाने मांडलेली ही व्यथा सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आष्टी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

या सभेत बोलताना समीर शेख या पदवीधर तरुणाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचे वास्तव परखड शब्दांत मांडले. समीर म्हणाला, "ग्रामीण भागात आज ३० ते ३५ वयोगटातील हजारो तरुण पदवीधर आहेत, ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही. त्यात मीदेखील आहे. ११८ परीक्षा देऊनही नोकरी मिळालेली नाही. घरचे म्हणतात दिवसभर कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरतो, पण हातात काहीच काम नाही. त्यामुळे लाचार होऊन दिवसभर चहा-वडापाव वरती दिवस काढावा लागतो. आमची नेतेमंडळींना कळकळीची विनंती आहे की, एकतर आमच्या लग्नाचा मार्ग काढा, अन्यथा जोपर्यंत आमचे लग्न होत नाही आणि नोकरी लागत नाही, तोपर्यंत ३० वर्षांवरील पदवीधरांना दरमहा ५ हजार रुपये मानधन सुरू करा."

या तरुणाने मांडलेल्या समस्येवर आमदार सुरेश धस यांनीही आपल्या खास शैलीत भाष्य केले. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते थेट पदवीधरांच्या विविध मागण्यांपर्यंत सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख करत धस यांनी, "पदवीधरांमध्ये धोरण नेमकं कोणाकडे चाललंय, की शेखसारखं थेट लग्नाकडे चाललंय?" अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

या प्रचारसभेत समोर आलेली तरुणाची ही व्यथा केवळ एका समीर शेखची नसून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नोकरीअभावी विवाह रखडलेल्या संपूर्ण मराठवाड्यातील हजारो पदवीधर तरुणांच्या मनातील खदखद असल्याचे उपस्थितांमधून बोलले जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.