Pune
Jarange Audio Clip Controversy: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवून खळबळ उडवून दिली. ज्यात काही लोक मनोज जरांगे यांना रोखण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करत आहेत.
यात एका व्यक्तीने जरांगेंसाठी श्रीकांत शिंदेंच्या हस्ते ५०० कोटी रुपये पोहोचवले आहेत, असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा जरांगेंनी केला. यावर आता शिंदेंच्या शिवसेनेतून आणि भाजपाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने ऑडिओची सत्यता पडताळली जावी, अशी मागणी केली आहे. तर शिंदे सेनेने या क्लिपमध्ये बोलणारे लोक भाजपाचे असल्याचे म्हटले आहे.
‘ते भाजपाचे लोक’
शिंदे सेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “ही ऑडिओ क्लिप दोन-अडीच वर्षांपूर्वीची आहे. ती आताच कशी बाहेर आली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. तेव्हा ही क्लिप बाहेर का नाही आली. अर्थात क्लिपमध्ये हे जे तीन-चार लोक बोलत आहेत, ते भाजपाचेच आहेत. त्यात दुमत नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे.”
“क्लिपमधील लोक कॉन्फरन्सवर बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यात छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई यांचे कनेक्शन आहे. कॉन्फरन्स कॉलमध्ये कुणीही हजार-पाचशे कोटी दिले बोलू शकतो. त्याला शेंडा ना बुडखा नाही”, असाही आरोप कदम यांनी केला.
एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा डाव
या क्लिपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कदम यांनी केली. त्या क्लिपमध्ये एक महिला श्रीकांत शिंदेंकडून पैसे पोहोचवले असे म्हणते. ती महिला कोण आहे? ते समोर आले पाहिजे. पैसे कुणी दिले, त्या महिलेकडे ५०० कोटी कुठून आले, हे समोर आले पाहिजे. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी एखादा पक्ष अशा क्लिप तयार करत असेल तर सर्व समाजाने एकत्र येऊन हाणून पाडले पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.
माझ्याकडेही एक ऑडिओ क्लिप
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर आरोप करत असताना रामदास कदम यांनी त्यांच्याकडेही एक क्लिप असल्याचे म्हटले. “माझ्याकडेही एक क्लिप आहे. ज्यात तुमच्या (जरांगे) गोपनीय बैठकीत भाजपाचे आमदार बसले आहेत. त्या बैठकीत आपण बोललात की, येथे बसलेले निम्मे लोक एकनाथ शिंदे यांचे चमचे आहेत. माझ्याकडे ती क्लिप आहे. मी कधीही हवेत बोलत नाही. मी जबाबदारीने बोलत आहे. या बैठकीत इंगळे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी आपल्याला अडवून हे बोलणे योग्य नसल्याचे सांगितले होते.”
मनोज जरांगेंच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपावर रामदास कदमांचे प्रत्युत्तर
रामदास कदम पुढे म्हणाले, “तुमच्या गोपनीय बैठकीत तुम्ही भाजपाच्या लोकांसमोर जर एकनाथ शिंदेंचे चमचे बसलेत, असा शब्दप्रयोग करत असाल तर शिंदेंबद्दल तुमची भूमिका काय आहे, हे दिसते. यावरून एक मराठ्याचा नेता दुसऱ्या मराठ्याच्या नेत्याला संपवत आहे का? हे चित्र दिसते.”
“जर ही क्लिप जुनी आहे, तर दोन वर्ष आपण का थांबलो होतो? जर समाजाच्या नेत्यावर अशाप्रकारे आरोप होत असतील तर जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहायला हवे होते. मराठा समाजाला न्याय देण्यात एकनाथ शिंदे यांचेही योगदान आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा आणि सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली जावी, यासाठी कायदेशीर अभ्यास कुणाच्या मदतीने झाली, हे जरांगेंनी विनोद पाटील यांना विचारून घ्यावे”, असेही रामदास कदम म्हणाले.