Pune
तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे यंदाही परंपरेनुसार नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला शनिवारी (दि. १७) रात्री ग्रामसभा झाली. त्यात २०२६-२७ या वर्षांचा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला.
विशेष म्हणजे, गावाने सलग २२ व्या वर्षीही पाण्याचा ताळेबंद मांडण्याची अनोखी परंपरा जपली.
दुष्काळाचे संकट समोर असतानाही काटेकोर नियोजन करीत सार्वजनिक नळपाणी पुरवठ्याद्वारे गावातील प्रत्येक कुटुंबाला दोन दिवसाआड ५०० लिटर पाणी देण्याचा निर्णय ग्रामसभेत कायम ठेवण्यात आला.
मुंबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या ग्रामसभेला धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपसंचालक ऋषिराज गोसकी, तहसीलदार मिलिंद कुलथे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, नायब तहसीलदार अभिजित वांडेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक सोहम साळुखे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, अॅड. विक्रम वाडेकर आदी उपस्थित होते.
१९९५ पासून पाण्याच्या ताळेबंदाचा अभ्यास करून पीकपद्धती ठरवली जाते. यंदा गावातील एकूण ४३९ पैकी ४३० विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तर केवळ ९ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या २० वर्षांत नळपाणी योजनेवर दुरुस्तीचा खर्च अवघा ८० हजार रुपये आला. ही संपूर्ण योजना गावातील महिला यशस्वीपणे चालवत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात हिवरे बाजार परिसरात अत्यल्प पाऊस नोंदवला गेला. गावातील तीन पर्जन्यमापकांवर नजर टाकल्यास गिरीमहाराज मंदिर परिसरात ४६.७मि.मी., चोपाळा गणपती मंदिर परिसरात २२.४ मि.मी. व लिंबाचा मळा येथे ५३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
गावाचे सरासरी पर्जन्यमान ४०.९ मि.मी. राहिले. या चार दिवसांच्या पावसामुळे गावाच्या शिवारात ३९.९५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले असून, प्रत्यक्ष वापरासाठी २७.०५ कोटी लिटर पाणी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
३५.२३ कोटी लिटर पाण्याची गरज गावाच्या विविध गरजांसाठी वार्षिक ३५.२३ कोटी लिटर पाण्याची गरज भासणार आहे. यामध्ये लोकसंख्या व जनावरांच्या पिण्यासाठी ७.७१ कोटी लिटर, खरीप पिकांसाठी २७ कोटी लिटर, रब्बी पिकांसाठी १२६.५ कोटी लिटर, तर उन्हाळी व बारमाही पिकांसाठी अन्य पाणी अपेक्षित आहे. ताळेबंदानुसार आगामी काळात ८.१७ कोटी लिटर पाण्याची तूट भासण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.