Pune Beed News : बीड जिल्ह्याच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरवर्षी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते.
मात्र, यंदा महायुतीचे आमदार सुरेश धस यांनी थेट वेगळी चूल मांडत या परंपरेला फाटा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सावरगाव गडाऐवजी आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा येथे स्वतंत्र दसरा मेळावा घेण्याचा निर्णय धस यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
येत्या २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता मच्छिंद्रनाथ गडावर संत, महंत आणि विश्वस्तांसोबत आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा रंगणार आहे. गडाचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व विश्वस्त मंडळाने या आयोजनाला केवळ नाथ संप्रदायाचा धार्मिक उत्सव असल्याचे स्वरूप दिले असले, तरी यामागील राजकीय संदर्भ लपून राहिलेले नाहीत. एकाच जिल्ह्यात आणि एकाच दिवशी अशा प्रकारे समांतर दसरा मेळाव्याचे आयोजन होणे, हा केवळ योगायोग नसून अंतर्गत संघर्षाचे उघड प्रदर्शन मानले जात आहे.
सावरगाव भक्तीगडावरील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठीच धसांनी हा नवा 'गड' निवडला की पक्षांतर्गत समीकरणांना शह देण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन आखले आहे, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर धस यांनी टाकलेला हा वेगळा राजकीय डाव आगामी काळात बीडच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.