आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं;

नितीन देशपांडे   290   17-10-2026 16:49:13

Pune 

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप असलेल्या एकाला पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार शेळके यांनी दिलेल्या तक्रारीत सुनील रघुनाथ गुजर (रा.पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सांगून शासनाचे बोगस ओळखपत्र वापरल्याचे तसेच नागरिकांना धमकावून पैशांची मागणी केल्याचे म्हटले आहे, तर आमदारांच्या कथित गैरव्यवहाराची माहिती मिळवल्यामुळे आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार गुजर यांनी केली आहे.

आमदार शेळके यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी ते मतदारसंघातील शासकीय कामासाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, संबंधिताने त्यांच्या वैयक्तिक, संवेदनशील व्यावसायिक तसेच खासगी माहितीबाबत इतर व्यक्तींच्या नावाने अर्ज करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दोन मोबाइल फोन आढळले आहेत. संबंधित अनेक दिवसांपासून आमदारांच्या कार्यालयात तसेच नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून येऊन त्यांच्यावर पाळत ठेवत होता. ही माहिती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करावी, त्याच्या दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासावेत, अशी मागणी आमदार शेळके यांनी पोलिसांकडे केली आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुजर यांची मारहाण झाल्याची तक्रार

आमदार सुनील शेळके यांच्या खाणींच्या रॉयल्टीसंदर्भातील कथित गैरव्यवहाराबाबत माहिती अधिकारातून माहिती मिळवल्यामुळे शुक्रवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयातील एका खोलीत बंद करून काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप सुनील गुजर यांनी केला आहे. आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून अवैध खाणींच्या जागा एमआयडीसीला अदलाबदल करून दिल्याचा, तसेच हजारो कोटी रुपयांच्या रॉयल्टी बुडवल्याचा आणि एमआयडीसीच्या जमिनींबाबत गैरव्यवहार केल्याचा आरोप गुजर व त्यांच्या मित्रपरिवाराने केला आहे. प्रशासकीय अधिकारी आमदार शेळके यांच्या दबावाखाली ही प्रकरणे दडपत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. संबंधित व्यक्तीने आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. मात्र असा कोणताही प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला नाही. त्यामुळे दोन्ही तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत आहोत. - संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.