Pune
Pradeep Purnekar: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शिंदे सेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Meenkashi Shinde) यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांना चौकशीला बोलावले होते. यावेळी राजेंद्र शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या मारेकऱ्यांना समोरासमोर बोलावून चौकशी केली. पोलिसांनी तब्बल नऊ तास राजेंद्र शिंदे यांची कसून चौकशी केली होती. या तपासात पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. राजेंद्र शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना ओळखत असल्याची कबुली दिली आहे. (Thane Crime news)
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी जे पाच आरोपी अटकेत आहेत, त्यांना मी ओळखतो. माझ्याकडे ते काम मागायला यायचे. माझी पत्नी त्या भागातील ज्येष्ठ नगरसेविका आहे. त्यामुळे आमच्या भेटीगाठी होत असतात. मात्र, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमध्ये माझा काहीही संबंध नाही, असा जबाब राजेंद्र शिंदे यांनी चौकशीदरम्यान दिला आहे. राजेंद्र शिंदे यांच्या या जबाबामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्याला एकप्रकारे बळकटी मिळाली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या गंभीर आरोप केले होते. माझ्या वडिलांच्या हत्येपूर्वी मी राजेंद्र शिंदे आणि मारेकऱ्यांना मी शिंदे राहत असलेल्या निळकंठ इमारतीच्या बाहेर पाहिले होते. याच इमारतीत बैठक झाली होती आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असा आरोप राम पूर्णेकर यांनी केला होता.
प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार मारले होते. याप्रकरणी पप्या शिंदे, संतोष कनजिया उर्फ टल्ली, अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू , निखिल यादव, नितेश पवार उर्फ भावड्या या पाच जणांना ताब्यात घेतले होते