बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रयत्नात तरुणी जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खानापूर : खानापूर घेरा सिंहगड, थोपटेवाडी आणि पाबे घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी अवघ्या एका तासात बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, यातील एका दुचाकीवरील तरुणी बिबट्याच्या पंजामुळे जखमी झाल्याची माहिती आहे.
यापूर्वी थोपटेवाडी आणि खामगाव परिसरातही बिबट्याने जनावरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिक, रात्री-अपरात्री प्रवास करणारे कामगार आणि खानापूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बिबट्याचा वावर असलेल्या भागात वनविभागाची गस्त वाढवावी, नियमित निरीक्षण ठेवावे आणि शक्य असल्यास बिबट्याला जीपीएस प्रणालीद्वारे ट्रॅक करण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्यापासून मानवी जीविताला गंभीर धोका असल्याचे आढळल्यास नियमानुसार पिंजरा लावून त्याला पकडून सुरक्षित अधिवासात हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ यांच्यासह सौरभ मोकाशी, रामदास गायकवाड, लक्ष्मण दारवटकर, गुरुदत्त हगवणे, विनोद थोपटे, राहुल भोसले, बाबाजी थोपटे, सागर भोसले, गणेश करंजावणे, बाप्पू वसवे, संदीप पवार, हर्षद भोसले आणि प्रसाद जावळकर यांनी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.