Beed
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात आरोपी विष्णू महादेव चाटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे.
न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. खंडणीची मागणी, कंपनीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचण्यात चाटे याचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीनुसार, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी आवाडा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून संपर्क करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी मस्साजोग येथे कंपनीच्या प्रवेशद्वारावर काम बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. सरपंच संतोष देशमुख यांनी याला विरोध केला होता. या घटनांनंतर ९ डिसेंबरला देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने या घटनांमधील परस्परसंबंध आणि कटातील चाटेची भूमिका विचारात घेतली. कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि आवाजाच्या नमुन्याचा न्यायवैद्यक अहवाल या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने जामीन नाकारला. यापूर्वी बीडच्या विशेष न्यायालयाने २३ डिसेंबर २०२५ रोजी चाटे याचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते.
बचाव पक्षाच्या वतीने ॲड. पी. एस. तळेकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी उपस्थित नव्हता. तसेच राजकीय वैमनस्यातून गोवल्याचा दावा करत तीन गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोपपत्र आणि मकोका लावण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने हा आक्षेप अमान्य करत जामीन देण्यास नकार दिला. सरकारतर्फे ॲड. ए. बी. गिरासे तर प्रतिवादीतर्फे ॲड. पी. व्ही. गिरी यांनी बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला एका वर्षानंतर पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे.