आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

श्वानाला खाऊ घालण्याची सवय ठरली जीवघेणी; रेबीजमुळे १४ वर्षीय अतुलचा मृत्यू

शरद लाटे  10   12-10-2026 17:41:35

 

शाळेत पाणी पाहताच घाबरला, किंचाळू लागला; उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास

मुरादाबाद : लहान मुलांना प्राणी-पक्ष्यांविषयी विशेष प्रेम असते. कुत्रा किंवा मांजर दिसले की त्यांना खाऊ घालणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांची काळजी घेणे, अशा सवयी अनेक मुलांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर योग्य खबरदारी न घेतल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव करून देणारी घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडली आहे. कुत्र्याला खाऊ घालताना बोटाला नख लागल्यानंतर रेबीजची लागण झाल्याचा संशय असलेल्या १४ वर्षीय अतुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अतुल हा इयत्ता सातवीत शिकत होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो एका कुत्र्याला खाऊ घालत असताना त्याच्या बोटाला कुत्र्याचे नख लागले होते. जखम किरकोळ असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनेनंतर रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

शाळेत अचानक प्रकृती बिघडली

नेहमीप्रमाणे शाळेत गेलेल्या अतुलला काही वेळानंतर अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर पाणी पाहताच तो घाबरू लागला आणि जोरात किंचाळू लागला. त्याची अवस्था पाहून शिक्षक आणि वर्गातील विद्यार्थीही घाबरले. शाळेने तातडीने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.

कुटुंबीयांनी अतुलला आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाली. डॉक्टरांच्या तपासणीत रेबीजचा संसर्ग असल्याचे सांगण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन

या घटनेनंतर डॉक्टरांनी नागरिकांना प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कुत्रा किंवा अन्य सस्तन प्राण्याने चावा घेतल्यास, ओरखडा काढल्यास किंवा लाळ जखमेवर अथवा डोळे-तोंडासारख्या श्लेष्मल भागांवर लागल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. त्यानंतर विलंब न करता आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक असल्यास इम्युनोग्लोब्युलिन घ्यावे. जखम लहान असली किंवा रक्त आलेले नसले, तरी धोका दुर्लक्षित करू नये.

रेबीजची लक्षणे दिसू लागल्यानंतर हा आजार जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. त्यामुळे प्राण्यांच्या संपर्कानंतर वेळेत प्रतिबंधात्मक उपचार घेणे हाच जीव वाचवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.