Pune
कृषी सेवा परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील कथित त्रुटींचे पुरावे सादर करूनही फेरतपासणीबाबत कोणताही लेखी आदेश निघाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये त्यांनी पुरावे पाहून आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून फेरतपासणीचे आश्वासन दिले होते.
मात्र, मंत्रालयात पाठपुरावा केल्यानंतर या आश्वासनासंदर्भात कोणताही लेखी आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फेरतपासणीच्या आश्वासनाचे पुढे काय झाले, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
यावर आता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी एक विशेष टिपण्णी केली आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या समितीसमोर विद्यार्थ्यांनी कृषी परीक्षेत झालेल्या त्रुटींची माहिती दिली. यावर उत्तरपत्रिकांच्या तपासणीत झालेल्या त्रुटी राधा समितीने मान्य केल्या. मात्र, भरती प्रक्रिया पुढे गेल्यामुळे आता फेरतपासणी होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा त्रुटी होणार नाहीत, असे सांगून विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्या सचिवांनीही नियुक्ती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेले नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) फेरतपासणीबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली नसल्याने नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल, अशी भूमिका विभागाने घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कृषी विभागाचे मत काय?
कृषी विभागाच्या उपसचिवांकडे उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील त्रुटींचे पुरावे सादर करताना विद्यार्थ्यांना अवमानकारक टिप्पणीला सामोरे जावे लागल्याचाही आरोप आहे. तसेच प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनीही भरती प्रक्रिया पुढे गेल्यामुळे कृषी सेवा परीक्षेच्या फेरतपासणीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण उत्तरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे. कृषी विभागाच्या उपसचिवांकडे उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील कथित त्रुटींचे पुरावे सादर करताना विद्यार्थ्यांची अवहेलना करण्यात आल्याचाही आरोप आहे. 'एवढे पुरावे गोळा करण्याऐवजी तेवढा अभ्यास केला असता, तर उत्तीर्ण झाला असता,' अशा आशयाची टिप्पणी करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याऐवजी आपली खिल्ली उडवली जात असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
गोंडवाना विद्यापीठात वकिलाच्या नियुक्तीवरून वाद; १५ लाखांच्या खर्चावर आक्षेप, थेट राज्यपालांकडे तक्रार…
राज्यसेवेला न्याय, कृषी सेवा उमेदवारांचे काय?
राज्यसेवा परीक्षेच्या प्रकरणात फेरतपासणी मान्य करण्यात आली असताना कृषी सेवा परीक्षेतील विद्यार्थ्यांना वेगळा निकष का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील कथित त्रुटींचे पुरावे सादर केले असताना केवळ भरती प्रक्रिया पुढे गेल्याचे कारण देऊन फेरतपासणी नाकारणे अन्यायकारक असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने केवळ विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी होती का? पुरावे सादर करूनही आणि त्रुटी मान्य केल्याचे सांगितले जात असतानाही न्याय मिळणार नसेल, तर दाद मागायची कुठे? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.