Pune
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच्या साथीने पुरुषोत्तम जगताप यांनी तिसरं पॅनल उभं केलं या निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.
21 जागांसाठी तब्बल 83 उमेदवार मैदानात आहेत. तर या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, अशातच काल (गुरूवारी, ता 8) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार (Jay Pawar) यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत. जय पवारांनी परिवाराच्या भेटीबाबत आलेल्या बातम्यांबाबतही सविस्तरपणे भाष्य केलं आहे, पुढे जय पवार (Jay Pawar) यांनी म्हटलं की, आमच्यामध्ये दादांचं रक्त आहे, दादा काम करत गेले, आपण पण सगळ्यांसाठी काम करतच राहायचं, त्याच्यामुळे आम्ही ही कामं करत राहू. (Jay Pawar)
पुढे जय पवार म्हणाले की, आज आपलेच भावकीतले काही लोक आहेत, काही दिवसापूर्वी ठरलं की एकामेकांबद्दल बोलायचं नाही, मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे पण, सुप्रिया आत्यांच्या आम्ही घरी गेलेलो, पार्थ दादा, मी आणि युगेंद्र दादा, कारण रेवती आमची बहीण तिचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदा घरी आली आणि आधीपासून आम्ही त्यांना भेटायला जायचो. साहेबांकडे, सुप्रिया आत्याकडे, तर त्या दिवशी आम्ही भेटायला गेलो, त्या दिवशी आम्ही तिथे गेल्यानंतर लगेच ब्रेकिंग न्यूज आल्या सोमेश्वरमध्ये हे सगळे एकत्र येतात, एकत्र येतात, त्या दिवशी सुप्रिया आत्या बोलल्या की मला कारखान्याचं काय माहिती नाही, ते दादा बघायचे आणि साहेब बघायचे, पण तुम्हाला चर्चा करायची तर तुम्ही करा, तेव्हा युगेंद्र दादांनी पार्थ दादाला आणि मला विचारलं की, आपण एकत्र यायचं का? त्याच्यावरती पार्थ दादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की, युगेंद्र आम्ही खरच चर्चा केली पण आमचे कार्यकर्ते बोलतात की असं नाही करायला पाहिजे आणि आमचे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, आमच्यासाठी काम करतात, त्यांचंपण आम्हाला ऐकायला लागतं, त्याच्यामुळे आपण तो पुढाकार नाही घेतला आणि मग त्याच दिवशी ठरलं की ते आपल्याबद्दल बोलणार नाही आणि आपण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण आज मला बातमी कळाली की त्यांनी सांगितलं की माळेगावमध्ये दादा गेल्यानंतर 70 कोटीचं नुकसान झालं, लगेच मी ती बातमी बघितली, मी सगळ्यांना फोन लावले, तसं काही नाही झालं काही, कारखाना दोन कोटीच्या प्रॉफिटमध्ये आहे, आज आणि हे पण लोकांच्या मनात पाहिजे कारण उगीचच खोटे अफवा लोकांना सांगून निवडणूक नाही लढायची, आपले पुढचे विद्यमान चेअरमन ते काय बोलतात त्यांच्यामुळे भाव मिळाले, त्यांच्यामुळे दर मिळाला मग दादांनी काय केलं, अनेक वर्ष दादांनीच त्यांना संधी दिली ना, दादांनी त्यांना जेव्हा अडचण होती, नाहीतर काय तातडीची गरज होती, ते तेव्हा दादांनाच फोन लावायचे, त्याच्यामुळे त्यांनी पण तसं नाही करायला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली. युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी पार्थदादांनी स्पष्ट सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं.' त्यानंतरही आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती,' असं जय पवार यांनी सांगितलं.
माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'दादा गेल्यानंतर माळेगाव कारखान्याचं 70 कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. त्यानंतर मी या विषयाची माहिती घेतली. मात्र, कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती माझ्यासमोर आली, निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा. उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना काय खरं आणि काय खोटं, हे चांगलं कळतं. त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,' असा इशारा जय पवार यांनी दिला.
Jay Pawar Baramati : निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच्या साथीने पुरुषोत्तम जगताप यांनी तिसरं पॅनल उभं केलं या निवडणुकीत आणखी रंगत आली आहे. 21 जागांसाठी तब्बल 83 उमेदवार मैदानात आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात आज तिन्ही पॅनलच्या सांगता सभा होणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल उभं केलं आहे. याचे नेतृत्व सुनेत्रा पवार करीत आहेत ज्यांचे चिन्ह कपबशी आहे. या पॅनेलची सांगता सभा सुनेत्रा पवार, विजय शिवतरे आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते यांच्या उपस्थितीत पार पडेल. शरद पवार गटाचे सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल मैदानात आहे. याचे नेतृत्व युगेंद्र पवार करत आहेत. यांचे चिन्ह किटली आहे आज सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पाडणार आहे.
राष्ट्रवादी मधून बंडखोर पुरूषोत्तम जगताप यांनी भाजपच्या साह्याने लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल उभं केलं आहे. ज्याचे चिन्ह शिट्टी आहे. या सांगता सभेला पुरुषोत्तम जगताप पुरंदर हवेली चे माजी आमदार भाजप नेते संजय जगताप आणि शरद पवार गटाचे पुरंदर तालुक्यातील दोन नेते माणिकराव झेंडे आणि सुदाम इंगळे यांची उपस्थिती असेल. आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये तिनी पॅनलच्या सांगता सभा पार पडतील. अकरा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल या निवडणुकीत सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठापणा लागलेली आहे तसेच युगेंद्र पवारांची देखील प्रतिष्ठापनाला लागली आहे.. सोबत भाजपदेखील या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्या साह्याने कडवा आव्हान सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांना देत आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आजच्या सांगता सभेमध्ये कोण काय बोलतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल आज संध्याकाळी या सभा पार पडतील.