आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजितदादा मोठ्या मनाचे, पण मी तशी नाही; एकदा बाहेर ते कायमचे बाहेर

नितीन देशपांडे   329   07-10-2026 16:11:31

Pune 

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे.

कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अफवा पसरत असून, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, एकदा बाहेर पडलेला व्यक्ती कायमचा बाहेरच राहील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत. मात्र, सध्या कोण कोणाच्या जवळ येणार, कोण पुन्हा सोबत येणार, अशा अनेक चर्चा आणि अफवा ऐकायला मिळत आहेत. या चुकीच्या अफवांना बळी पडू नका. "एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते. दादांसारखी मी नाही," असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक प्रचारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबतही अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव आधीच निश्चित करण्यात आलेले नाही. निवडणूक झाल्यानंतर निकालाच्या आधारे आणि सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष सर्वसमावेशक असेल आणि सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"चेअरमन आधीच ठरवलेला नाही. निवडणूक होऊ द्या, त्यानंतर चेअरमन कोण असेल ते ठरवू. अनेक अफवा येतात; त्या केवळ अफवाच आहेत. कोणतीही गोष्ट खरी नाही, हे लक्षात ठेवा," असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.