आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे शहर बंद करून दाखवाच', महापौर मंजुषा नागपुरे यांचे रोहित पवार यांना थेट आव्हान

नितीन देशपांडे   72   06-10-2026 17:26:52

Pune 

राज्यभरातून लाखो विद्यार्थी येथे करिअर घडवण्यासाठी येतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून कोणी शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर पुणेकर ते खपवून घेणार नाहीत.

आमदार रोहित पवार यांनी पुणे शहर बंद पाडून दाखवावेच मग त्यांना कळेल पुणेकर काय आहेत ते... असा इशारा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, "पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून आंदोलने सुरू आहेत. आंदोलन करणे हा लोकशाहीचा भाग असला, तरी सामान्य नागरिकांना वेठीस धरून आणि दैनंदिन जनजीवन विस्कळीत करून विद्यार्थ्यांचे भले साधता येणार नाही. रोहित पवार यांनी पुणे बंदची हाक दिली आहे, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की पुणेकर काय आहेत हे त्यांना अशा आंदोलनातून नक्कीच समजेल. इथून पुढे पुणेकर कोणतेही राजकीय आंदोलन किंवा शहराची कोंडी सहन करणार नाहीत आणि आम्ही शहर अजिबात बंद पडू देणार नाही."

विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करताना महापौर म्हणाल्या, राज्यभरातील पालक अत्यंत कष्टाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांच्या नादी लागून स्वतःचे भवितव्य धोक्यात घालू नये. नेत्यांच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून स्वतःचे नुकसान करू नये, उलट आपल्या अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे.

दरम्यान, एमपीएससीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यावरून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. पेपरफुटीच्या प्रकरणातून अंग काढून घेण्यासाठी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवत हा राजीनामा दिला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही पुणे बंद पाडू असा इशारा पवार यांनी दिला होता. या इशाऱ्याला महापौरांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने पुण्यात आता या विषयावरून राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.