Pune
ठाण्याच्या मानपाडा परिसरात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर कोयत्यानेही वार केले.
पूर्णेकर यांचा मानपाड्यासह मनोरमा नगर आणि आझाद नगर परिसरात मोठा जनसंपर्क होता. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जात असला, तरी या भागात पूर्णेकर यांच्या माध्यमातून ठाकरे गटाचीही मजबूत पकड होती. त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच, "सध्या जे काही करायचं आहे ते शांतपणे आणि विचार करून करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका," असा सल्ला त्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाला आणि भावाला दिला.
उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबाला धीर देताना, "आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहू," असे आश्वासन दिले. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता, मुलगा राम आणि मुलगी भावूक झाले होते. प्रदीप पूर्णेकर यांची उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरी एकदा तरी यावे, अशी इच्छा होती. त्यामुळे तुम्ही आज घरी आलात हे पाहून त्यांना आनंद झाला असता, अशी भावना कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
शेअर बाजार कोसळला; 'या' तीन कारणांमुळे गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले
दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
एफआयआरमध्ये काही नावांचा समावेश करण्यावरूनही पूर्णेकर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले. "मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यास पोलीस सुरुवातीला तयार नव्हते. मात्र, संजय राऊत आल्यानंतर दोघांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली," असा दावा पूर्णेकर यांच्या पत्नीने केला. त्यानंतर मिनाक्षी शिंदे पोलीस ठाण्यात मागील बाजूने आल्या आणि एफआयआरवर स्वाक्षरी करून निघून गेल्याचेही त्यांनी सांगितले.