बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आष्टी, धारूर, पाटोदा तीन तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे यांनी जलहक्क जनआक्रोश मोर्चा काढला.
या मोर्चात धोंडे-आजबे जोडीने भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते. आजबे यांनी तर वादाच्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू आहे, साहेब मॅडमला आवरा, असे म्हणत धस यांच्या पत्नीवर अप्रत्यक्ष टीका केली होती.
धस यांनी मोर्चात लोकांनी येऊ नये यासाठी गावच्या सरपंचाना आणि नागरिकांना फोन केल्याचा आरोप आजबे-धोंडे यांनी केला होता. या आरोपांचे आणि धस यांच्या पत्नीवर केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मोर्चाआडून पती आणि आपल्याला टार्गेट करणाऱ्या बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.
बाळासाहेब आजबे (Balasheb Ajabe), आधी जिभेला आवर घाला, भाऊसाहेब आजबेंचे वारस असाल तर आरोप सिद्ध करा, अन्यथा तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशाराच प्राजक्ता धस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला. दुष्काळाच्या प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांऐवजी माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब आजबे यांनी आधी स्वतःच्या जिभेला आवर घालावा.
माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. भाऊसाहेब आजबे यांचे खरेच वारस असाल, तर केवळ आरोप करून पळ काढू नका पुराव्यांसह आरोप सिद्ध करा, अन्यथा न्यायालयात खेचू असा थेट इशाराच महानंदच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी दिला आहे. बाळासाहेब आजबेंविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आजबे नैराश्यात
पाच वर्षांच्या कार्यकाळात जनाधार तब्बल एक लाख मतांनी घसरल्याने आजबे राजकीय नैराश्यातून सुडाचे राजकारण करत आहेत. वैयक्तिक बदनामी करून राजकारण करण्याची मर्यादा ओलांडली गेल्याने आता राजकीय उत्तरामधून सूट न देता कायदेशीर मार्गानेच धडा शिकवणार असे म्हणत प्राजक्ता धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला.