Pune -
एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी ब्रेक लावला आहे. पवारांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. कुणाला यायचं असेल तर आमच्या या असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून एक प्रकारे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ऑफरच देण्यात आली आहे.
तसेच दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात राहणंच योग्य असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
अजितदादांच्या नेतृत्वामध्येच एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही मत व्यक्त केलं असेल त्यावर मी काही बोलणार नाही, असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी ही भूमिका आत्ताच का मांडली? त्या मागे काय राजकीय अर्थ असू शकतो? असाही प्रश्न यावेळी सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना तटकरे यांनी म्हटलं की, शरद पवार यांचं टायमिंग हे त्यांनाच माहिती. अनेकदा पवारांनी राजकारणात टायमिंग साधलं आहे. 80 च्या दशकात, 90 च्या दशकात 2010 च्या नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने टायमिंग साधलेलं आहे, त्यामुळे आता पवारांच्या विधाना मागचं नेमकं टायमिंग काय आहे, हे साहेबांनाच माहिती असंही यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील विलीनीकरणासंदर्भात मोठं विधान केलं होतं. विलीनीकरण झालं तर एकाच अटीवर होईल, ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटानेच आमच्या पक्षात यावं? यावर देखील यावेळी सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांनी नेमकं काय विधान केलं ते मी ऐकलं नाही. पण ते जर तसं काही बोलले असतील तर ते त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखालीच आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं. त्यामुळे ते वक्तव्य त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही एनडीएसोबत आहोत आणि भविष्यातील आमची वाटचाल ही एनडीएसोबतच असेल, असं विधान यावेळी सुनील तटकरे यांनी केलं आहे.