आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

लग्नाला अवघे 4 महिने… ‘5 लाखांसाठी’ IT इंजिनिअरचा अंत!

शरद लाटे  450   27-09-2026 09:25:38

Pune 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र तयार होत असताना आता घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुणे हादरलं असताना आता आणी एका वैष्णवीचा सासरच्या छळामुळे जीव गेला आहे.

चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये द्या म्हणत विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. त्यानंतर 23 वर्षाच्या वैष्णवीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

लग्नात 45 लाख खर्च, दहा तोळं सोनं दिलं


छळाला कंटाळून उंड्री-वडाचीवाडी परिसरातील राहत्या घरी विवाहितेने आत्महत्या केली. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह 9 मे 2026 रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. लग्नात 45 लाख खर्च केला. दहा तोळं सोनं दिलं तरीही सासरच्यांची भूक भागत नव्हती. त्यांनी कार घेण्यासाठी आणखी पाच लाखांची मागणी केली. तसेच वैष्णवीचा छळ देखील केला जात होता.

सासरच्या मंडळींकडून सतत त्रास


लग्नाच्या महिन्याभरानंतरच 10 जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत किंवा गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर वैष्णवी सासरी 23 दिवस सुट्टीवर होती. त्यानंतर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे गेली. जूनअखेरीस ती पुन्हा सासरी आली आणि घरातूनच आयटी कंपनीचं काम करू लागली. त्यानंतर तिला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता. तिला ऑफिस करून नंतर घरकाम करण्यास सांगितलं जात होतं.

तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर...


वैष्णवीला सतत त्रास दिला जात होता. 24 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन करून सासरी खूप त्रास होत असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर रात्री साडेआकराच्या सुमारास 'तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल', असं म्हणत वैष्णवीच्या नवऱ्याचा फोन तिच्या माहेरच्यांना आला. त्यानंतर वैष्णवीला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन लागला नाही. आई वडील तातडीने पुण्याला निघाले.

जेव्हा आई वडील तिच्या सासरी पहाटे पहाटे पोहोचले तेव्हा वैष्णवीचा मृतदेह गोधडीने झाकलेल्या अवस्थेत आढळला. तिने पंख्याला गळफास लावून घेतल्याचं सासरच्या मंडळींनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.