Pune
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक असून, पवार कुटुंब प्रथमच आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध (Unopposed) व्हावी, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती समोर आली आहे.
कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक मंडळ कार्यरत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार दोन्ही बाजूंकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांच्या गाठीभेटी आणि तयारी सुरू होती. त्याचवेळी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील आपले स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
Someshwar Karkhana Election : 21 जागांसाठी 514 उमेदवार; 30 सप्टेंबर अंतिम तारीख
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एकूण 21 जागांसाठी तब्बल 514 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, ज्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 आहे.