आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नितीन देशपांडे   515   17-09-2026 16:50:24

Pune 

मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विकासासंदर्भात राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

…आणि मराठवाडा मुक्त झाला!

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास संक्षेपात सांगितला. "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा स्वातंत्र्यासाठी झगडत होता. १३ महिन्यांनंतर मराठवाड्याला मुक्ती मिळाली. या लढ्यात ज्या ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपलं बलिदान दिलं, कारागृहात अत्याचार सहन केले, सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलनं केली, अशा सर्व स्वातंत्र्यसंग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो. जे आमच्यामध्ये नाहीत, त्या सर्वांना आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या बलिदानामुळेच खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्त झाला आहे. तेव्हाचे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी लढाई उभी केली आणि चारही बाजूंनी दबाव तयार केला आणि त्यातून मराठवाडा मुक्त झाला", असं ते म्हणाले.

वंदे मातरम् उच्चारण्यावरही बंदी होती - देवेंद्र फडणवीस

"आज आपण वंदे मातरमची १५०वी शताब्दी साजरी करतोय. पण वंदे मातरम शब्द उच्चारण्यावरही त्या काळात बंदी होती. मराठी बोलण्यावर बंदी होती. मराठी शिकवायला बंदी होती. अत्याचाराची परिसीमा पाहायला मिळाली. सण-उत्सव साजरे करता येत नव्हते. अशा अवस्थेतून मराठवाड्याला बाहेर काढण्याचं काम स्वातंत्र्यसेनानींनी केलं", असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही"

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील दुष्काळाचा उल्लेख करतानाच शेतकऱ्यांना आश्वासित केलं. "मराठवाडा सातत्याने संघर्ष करतोय. विकासाचा मोठा संघर्ष मराठवाड्यात चालला आहे. सर्वात जास्त दुष्काळाचं संकट मराठवाड्यावर घोंघावताना दिसतं. हे वर्षदेखील दुष्काळाचं वर्ष आहे. असं वाटत होतं की यावेळी पीक चांगलं असेल. पण पावसाचा मोठा खंड पडला आणि शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. मी त्या शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत आपलं सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहील. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल", असं ते म्हणाले.

४८ हजार कोटींची वीजबिलं रद्द - मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांची थकित ४८ हजार कोटींची वीजबिलं रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. "शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केलाय. पण आता त्यांची जुनी ४८ हजार कोटींची बिलं रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कुठलीही अडचण होणार नाही", अशी माहिती त्यांनी दिली.

मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होणार?

मराठवाड्यातील दुष्काळावर उपाययोजना करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. "उल्हास खोऱ्यातून ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचं काम चालू आहे. या पिढीनं दुष्काळ पाहिला आहे, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. एकूण ७ वर्षांत टप्प्याटप्प्यानं हे पाणी गोदावरी खोऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू. त्यातून मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करू", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.