आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य

Swati Jain   53   15-09-2026 10:33:23

Pune Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, त्यांच्या मुंबईतील उपोषणाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या वतीने तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे.

या नव्या अर्जामध्ये पोलिसांनी यापूर्वी ज्या कारणांवरून परवानगी नाकारली होती, त्या सर्व अटींचं पालन करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे.

आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल, असंही अर्जात स्पष्ट करण्यात आलं आहे.

जरांगेंच्या अर्जातील 20 अटी

मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांनीयापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतर आता तिसऱ्यांदा अर्ज करताना पोलिसांनी घातलेल्या अटी मान्य करण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे.

या अर्जामध्ये एकूण 20 अटी मान्य करण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन आयोजकांकडून देण्यात आलं आहे.

अर्जातील महत्त्वाच्या अटींनुसार, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास आंदोलनाची परवानगी दाखवण्यासाठी तिची मूळ प्रत सोबत बाळगण्यात येणार आहे. तसेच अर्जात नमूद करण्यात आलेल्या आंदोलकांच्या संख्येची मर्यादा कायम ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आंदोलन शांततेत करण्याचं आश्वासन

आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून चिथावणीखोर भाषण किंवा जमावाची भावना भडकवणारी वक्तव्ये केली जाणार नाहीत, असं आश्वासन देण्यात आलं आहे. याशिवाय आंदोलनस्थळी कोणत्याही प्रकारची वाहनं आणली जाणार नसल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये ट्रॅक्टर, ढकलगाडी (ट्रॉली), बैलगाडी, सायकल रिक्षा आणि हातगाडी यांसह इतर वाहनांचा समावेश आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.