Pune
मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही.
त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करत मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा करत मराठा समाजाला मोठ्या संख्येनी मुंबईला येण्याचं आवाहन आधी केलं होतं. मात्र, आता मनोज जरांगे यांनी आज (१४ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक मोठी घोषणा केली आहे. “सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय, आता सरकार कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आज (१२ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आता मला खिंड लढू द्या. आता मी एकटा लढतो. जेव्हा रस्त्यावरील काटे संपतील तेव्हा मी तुम्हाला (मराठा समाजाला) सांगतो, केव्हा मुंबईला यायचं. आता यामागचं कारण सांगतो. पहिला मुद्दा म्हणजे उद्या (१५ सप्टेंबर) मी एकटाच मुंबईला निघणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊ नका. पण तुम्ही ज्या गाड्या लावल्या आहेत, वर्गणी करून तुम्ही जे वाहनं लावलेले आहेत, ते सध्या जशाच्या तसंच ठेवा, त्या वर्गणीमधील पैसे देखील खर्च करू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
तुम्ही आणि मी आपल्या दोघांना आता एकमेकांचं ऐकावं लागणार आहे, तेव्हाच या आंदोलनाचा रथ पुढे चालणार आहे. आता डावपेचानेच हा रथ पुढे जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सण-उत्सवांच्या आडून डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण देखील तशास तसाच डाव टाकणार आहोत. सगळे मराठे मुंबईला गेले तरी आरक्षणच मागायचं आहे आणि मी एकटा गेलो तरी आरक्षणच मागायचं आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांना योग्यवेळी मुंबईला बोलावलं जाईल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल?
मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने निघतील. चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी ते मुंबईत दाखल होतील.
१५ सप्टेंबर : पहिला मुक्काम पाटोदा (जि.बीड).
१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि.अहिल्यानगर).
१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).
१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली (रायगड).
१९ सप्टेंबर : रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील.
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली?
मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे निघणार असून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
१) नियम २०२५ मधील नियम ११ (ड) नुसार आंदोलनादरम्यान आमरण उपोषण किंवा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यास सक्त मनाई आहे.
२) एका आंदोलनास एका वेळी फक्त एकच दिवसासाठी (सकाळी ९ ते संध्याकाळी ६) परवानगी दिली जाते. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी नसते. जरांगेंनी शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पुढे मागण्या मान्य होईपर्यंत अनिश्चित कालावधीसाठी उपोषणाची मागणी केली आहे, हे नियमांचे उल्लंघन आहे.
३) पोलिसांनी वाहतूक कोंडीचंही कारण दिलं. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. मनोज जरांगेंनी "गाड्या लाखात आहेत" असे वक्तव्य अंतरवाली सराटीमध्ये केलं होतं. गेल्या वर्षी सुमारे ५ हजार वाहनं दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे उभी करून रस्ता रोको केला गेला. यंदाही तशीच शक्यता असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचा धोका आहे.
४) सार्वजनिक ठिकाणी अडथळा : मोर्चे, रस्ता रोको, रेल्वे स्थानके, महापालिका मुख्यालय व महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्त्यावर बसणे किंवा झोपणे यावर मनाई आहे. मागील आंदोलनाचा अनुभव असा होता की गेल्या वर्षी बेस्ट बसमध्ये घुसखोरी, वाहनांवर चढून विक्षेप कृत्य करणे, नारेबाजी करणे यामुळे १३ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. लाखो आंदोलक आल्यास त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही.
५) नियम ६ नुसार आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार असावी लागते. आझाद मैदानात ७ हजार चौरस मीटर जागा राखीव असून तेथे फक्त ५ हजार आंदोलक समावू शकतात. लाखोंच्या संख्येचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं होतं. गेल्या वर्षी ५ हजार आंदोलकांची मर्यादा असताना सुमारे ४० हजार आंदोलक आले होते. ज्यामुळे इतर आंदोलकांच्या आंदोलनाच्या हक्कावर गदा आली होती.
६) सार्वजनिक आरोग्याच्या नियम ११ (ज) नुसार विनिर्देशित क्षेत्रात अन्न शिजवणे व कचरा टाकणे मना आहे. गेल्या वर्षी रस्त्यावर व वाहनांमध्ये अन्न शिजवून कचरा टाकल्याने तसेच फूटपाथवर अंघोळ केल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या सगळ्याचा रुग्णालयांवर परिणाम झाला होता.
७) गणेशोत्सवाचं कारणही मुंबई पोलिसांनी दिलं आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की १४ सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई कायम संवेदनशील असते. आंदोलनाची अलोट गर्दी झाल्यास पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.