Pune
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील राजधानी मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरी मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत.
अशा परिस्थितीत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवला आहे. सरकारच्या भूमिकेमुळेच जरांगे पाटील यांना आंदोलन करावे लागत आहे, अशी टीका करीत समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांना सकल समाजाचा पाठिंबा असल्याचे शाहू महाराज म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज जरांगेंना पाठिंबा देताना काय म्हणाले?
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणासह विविध मागण्या आणि सोयी सुविधांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे. यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेले शांततामय मूक मोर्चे, तसेच विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये झालेली ठिय्या आंदोलने यांचा समावेश आहे.
या आंदोलनाच्या पुढील टप्प्याचा भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात्मक भूमिका घेत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा प्रदीर्घ उपोषणे केली आहेत.
मराठा समाजाचे आंदोलन थांबविण्यासाठी शासनाने वेळोवेळी विविध आश्वासने देऊन ही आंदोलने थांबवली. मात्र, आंदोलन थांबविताना शासनाने दिलेली आश्वासने पूर्णतः अंमलात आणण्यात शासन आणि शासकीय यंत्रणा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला सकल मराठा समाजाने यापूर्वीही पाठिंबा व्यक्त केला होता. आता होणाऱ्या आंदोलनालाही कोल्हापूर जिल्हातील मराठा समाजाचा पाठिंबा आहे. शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या कायदेशीर कसोटीवर टिकतील अशा पद्धतीने तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण कराव्यात, अशी आमची अपेक्षा आहे
आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी जरांगे पाटील यांची धडपड
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करू पाहणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुरक्षेचे कारण देत त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, या निर्णयानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः मुंबई पोलिसांकडे ईमेलद्वारे उपोषणाच्या परवानगीसाठी नवीन अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी त्यांच्या प्रतिनिधींकडून अर्ज करण्यात आला होता. परंतु, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकृत ईमेल पाठवून परवानगीची मागणी केली आहे. आझाद मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी या अर्जात केली आहे.