Pune
गणेश विसर्जन मिरवणूक या प्रसंगी मंडळे उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरतात. यंदा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मंडळांनी छुप्या पद्धतीने
ध्वनिक्षेपक लावल्यास गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा पुणेपोलिसांनी दिला आहे. पोलीस ध्वनिक्षेपक यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दहीहंडीनिमित्त शनिवारी ((दि. ५)) मध्यभागासह शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मध्यभागातील बहुतांश रस्त्यांवर शनिवारी सायंकाळनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश पेठेतील महाराणा प्रतापसिंह रस्ता, कसबा पेठेतील गणेश रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनिक्षेपकांबाबत पोलिसांनी नियमावली निश्चित केली आहे. शहरातील मध्यभागासह उपनगरातील सार्वजनिक मंडळांनी दहीहंडीची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी दुपारपासून अनेक भागातील रस्ते वाहतुकीसाठी सजावटीच्या कामानिमित्त बंद करण्यात आले आहेत. अनेक मंडळांनी लेझर झोत, उच्चक्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास पसंती दिली आहे. ध्वनिक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पोलिसांकडून काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिक्षेपक वापरल्यास पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरातील मध्यभागातील मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र, गेल्या पाच ते सात वर्षांत धनकवडी, वारजे, कोथरूड, सिंहगड रस्ता, विमाननगर, वडगाव शेरी, कात्रज भागांतील मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाशयोजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाला काही मंडळांकडून विधायक उपक्रमांची जोड देण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
ध्वनिक्षेपक यंत्रणेतील ‘प्रेशर मिड’, ‘प्लाझ्मा साउंड’ या उपकरणांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम धुडकावल्यास मंडळांविरोधात थेट गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येईल. दहीहंडी आणि गणेशोत्सवासह वर्षभरातील सर्वच सण-उत्सवांमध्ये आवाजासाठी ‘चार बास, चार टॉप’ वापर करण्यासाठी परवानगी राहणार आहे - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त