आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शोकसभा की हास्यजत्रा? हुंडाबळीच्या वेदनांवर उपमहापौरांची लाजीरवाणी थट्टा;

नितीन देशपांडे   292   02-09-2026 22:30:57

Pune 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रसंगी घडलेल्या एका प्रकारामुळे वाद निर्माण झाला आहे. पिंपरीतील शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्येप्रकरणी महापालिकेच्या सभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता.

मात्र, या शोकप्रस्तावावर बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर हसल्याचे दिसून आल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

महिलेच्या आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करताना लोकप्रतिनिधींकडून गांभीर्य आणि संवेदनशीलता अपेक्षित असते. मात्र, शोकप्रस्ताव सुरू असताना उपमहापौर हसल्याने त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकारामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, उपमहापौर शर्मिला बाबर शोकप्रस्तावावर बोलत असताना महापालिकेचा एक शिपाई दोन वेळा त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर उपमहापौर हसल्याचे दिसून आले.

शिपायाने नेमके काय सांगितले आणि त्यानंतर उपमहापौर का हसल्या, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शोकप्रस्तावाच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे एखाद्या नागरिकाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना सभागृहातील प्रत्येक सदस्याने प्रसंगाचे गांभीर्य राखणे अपेक्षित असते. विशेषतः आत्महत्येसारख्या संवेदनशील घटनेवर चर्चा सुरू असताना अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.