आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

हडपसरमधील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार, नाश्त्यामध्ये इडलीत झुरळ

शरद लाटे  37   29-08-2026 12:26:36

Pune 

हाॅटेल-रेस्टाॅरंटमध्ये खाद्यपदार्थात अळ्या, किडे, झुरळ आढळण्याच्या अनेक घटना घडत असताना आता यात हाॅस्पिटलदेखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला देण्यात आलेल्या नाश्त्यात इडलीमध्ये चक्क झुरळ आढळल्याचा धक्कादायक घटना घडली.

याहून गंभीर बाब म्हणजे, गुरुवारी (दि. २७) सकाळी घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यांनी यावर दिवसभरात कोणतीच कारवाई केली नाही. अखेर सदर महिला रुग्णाच्या मुलाने 'सीविक मिरर'ला शुक्रवारी (दि. २८) याबाबत माहिती दिली. 'सीविक मिरर'ने यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला संपर्क साधताच नंतर मात्र त्यांची धावपळ उडाली.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देणार का?

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि ओषधातील भेसळ तसेच अस्वच्छतेसह बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध राज्यभरात कडक मोहीम राबवली आहे. स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. असे असताना बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना अशा प्रकारचे अपायकारक अन्न मिळणे हादेखील नागरिकांच्या मूलभूत हक्काचा भंग ठरतो. त्यामुळे अशा प्रकारांकडे लक्ष देऊन तुकाराम मुंढे यावर काय कारवाई करतात, याकडे जागरुक पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्करोगावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल महिला रुग्णाच्या नाश्त्यात झुरळ; यापूर्वीही झाले आहेत निष्काळजीपणाचे आरोप

हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला देण्यात आलेल्या नाश्त्यात इडलीमध्ये चक्क झुरळ आढळल्याचा धक्कादायक घटना घडली. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यापूर्वीही निष्काळजीपणाचे आरोप झाल्याने त्यांच्या रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुणाल देशमुख यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना गुरुवारी (दि. २७) सकाळी नाश्त्यासाठी इडली-सांबार देण्यात आले होते. त्यांनी इडलीचा अर्धा तुकडा खाल्ल्यानंतर इडलीमध्ये झुरळ असल्याचे कुणाल यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी आईला उर्वरित इडली खाण्यापासून रोखले.

शुक्रवारी (दि. २८) याबाबत 'सीविक मिरर'सोबत बोलताना कुणाल म्हणाले, "नाश्ता देण्यात आला त्यावेळी मी खोलीत नव्हतो. माझी आई अद्याप भूलमधून पूर्णपणे शुद्धीवर येत होती. झुरळ हालचाल करत नव्हते आणि इडलीच्या थराखाली पूर्णपणे दबलेले असल्याने तिच्या ते लक्षात आले नाही. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. मी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र २४ तास उलटूनही रुग्णालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते."

'सीविक मिरर'च्या हाती लागलेल्या छायाचित्रांमध्ये झुरळ इडलीमध्ये झुरळ असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शुक्रवारी सायंकाळी 'सीविक मिरर'ने रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाने तातडीने संबंधित रुग्णाशी संपर्क साधला आणि माफीचे पत्र देण्याची तयारी दर्शवली. "रुग्णालयाने माझ्याशी संपर्क साधला आणि माफीचे पत्र देणार असल्याचे सांगितले," असे देशमुख यांनी पुढे सांगितले.

एफडीएकडे करणार तक्रार

यापूर्वी देशमुख यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करताना म्हटले होते, "माझ्या आईने संपूर्ण इडली खाल्ली असती तर काय झाले असते? रुग्णांना अन्न देताना कर्मचाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकरणी मी अन्न आणि औषध प्रशासनाकडे निश्चितच तक्रार करणार आहे."

देशमुख यांनी यापूर्वीही पुणे महापालिकेच्या रुग्णालयात औषधे, मलम आणि सिरप यांची अस्वच्छ पद्धतीने हाताळणी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर एफडीएने संबंधित रुग्णालयाला नोटीसही बजावली होती.

"रुग्णालयांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कर्मचारी नेमके काय करत होते? त्यांनी दक्षता का घेतली नाही? झुरळ इडलीवर फिरत नव्हते, तर ते इडलीच्या आत होते. त्यामुळे कॅटरिंग कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही," असेही देशमुख यांनी सांगितले.

हडपसरचे सह्याद्री हॉस्पिटल यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात

सह्याद्री हॉस्पिटलच्या हडपसर शाखेभोवती वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर २०२५ मध्ये ७६ वर्षीय रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर त्यांच्या काही नातेवाइकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला होता.

यानंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयातील काचा, खिडक्या आणि इतर साहित्याची तोडफोड केल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला आणि डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना रुग्णालयात बोलावण्यात आले होते. तोडफोडीप्रकरणी काही जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

रुग्णालय प्रशासनाने त्यावेळी रुग्णाला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते आणि त्याला अनेक आरोग्यविषयक गुंतागुंती होत्या, असा दावा केला होता. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पाळल्या, असेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. उपचाराबाबत मतभेद असल्यास ते योग्य कायदेशीर आणि वैद्यकीय मार्गाने सोडवले जावेत, असे सांगत रुग्णालय प्रशासनाने हिंसाचाराचा निषेध केला होता.

या घटनेनंतर वैद्यकीय संघटनांनीही प्रतिक्रिया देत आरोग्यसेवा क्षेत्रातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना अधिक मजबूत सुरक्षा देण्याची मागणी केली होती. डॉक्टरांवरील हिंसाचार आणि रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड यामुळे आपत्कालीन सेवा प्रभावित होऊ शकतात आणि इतर रुग्णांच्याही सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.