आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे महापालिका भरतीत हायटेक कॉपी! चष्म्यात कॅमेरा, टॉयलेटमध्ये उत्तरांचा शोध

नितीन देशपांडे   64   29-08-2026 09:37:36

Pune 

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाय कॅमेरा बसवलेल्या चष्म्याचा वापर करून परीक्षेतील प्रश्न बाहेर पाठविल्याचा आरोप तीन उमेदवारांवर आहे.

या प्रकरणी संबंधित तीन उमेदवारांसह परीक्षा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासन आणि IBPS संस्थेने सुमारे दीड महिना केलेल्या तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील आयकॉन डिजिटल झोन चिखलठाणा परीक्षा केंद्रावर हा गैरप्रकार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या परीक्षेला बसलेल्या एकूण 20,735 उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशीटची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तीन उमेदवारांच्या उत्तर देण्याच्या पद्धतीत मोठी विसंगती आढळली. परीक्षेच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांत त्यांनी फक्त प्रश्न वाचले. त्यानंतर तिघेही स्वच्छतागृहात गेले. तेथून परतल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत त्यांनी तब्बल 100 प्रश्न सोडवले. यातील 90 हून अधिक प्रश्नांची उत्तरे अचूक असल्याचे तपासात दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल लॉगचे विश्लेषण केल्यानंतर उमेदवारांनी चष्म्यात लपवलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संगणकावरील प्रश्न बाहेर पाठवल्याचा संशय बळावला. त्यानंतर स्वच्छतागृहात मिळालेल्या मदतीच्या आधारे उत्तरे शोधून ती परीक्षेत भरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णूकांत वाघमारे या तीन उमेदवारांसह योगेश राठोड आणि विकास गायकवाड या दोन परीक्षा केंद्र कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी हा पेपरफुटीचा प्रकार नसून हायटेक कॉपीचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भरतीतील गैरप्रकाराशी संबंधित जागा वगळून उर्वरित 146 पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.