आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

हिंजवडी आयटीतल्या वाहतूक कोंडींने त्रस्त महिला रस्त्यावर उतरणार; आंदोलनाची दिली हाक!

शरद लाटे  30   28-08-2026 15:09:54

हिंजवडी आयटीतल्या वाहतूक कोंडींने त्रस्त महिला रस्त्यावर उतरणार; आंदोलनाची दिली हाक!

तुम्हीही पुण्यात राहता आणि तुम्हालाही ट्रॅफिक चा कंटाळा आलाय का? पुण्याची ओळख आज फक्त शिक्षणाचं माहेरघर म्हणून नाही, तर देशातलं एक मोठं आयटी हब म्हणूनही आहे. हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या कंपन्या, देश-विदेशातून येणारे कर्मचारी आणि रोज लाखोंची वर्दळ असलेला हिंजवडीचा परिसर… पण याच हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सध्या एक वेगळाच प्रश्न सतावतोय. ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी काही किलोमीटरचं अंतर पार करायचं, पण त्यासाठी तासन्‌तास रस्त्यावर अडकून पडायचं… खराब रस्ते, पाण्याची समस्या, सुरक्षेचे प्रश्न आणि त्यात भर पडणारी प्रचंड वाहतूक कोंडी. त्यामुळे आता आयटी कंपनीत बसून काम करणारे कर्मचारीच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. सकाळी घरातून ऑफिसला निघालं की ट्रॅफिकमध्ये अडकायचं आणि संध्याकाळी ऑफिसमधून घरी निघालं की पुन्हा त्याच कोंडीत अडकायचं… हा आता पुणेकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय. काही किलोमीटरच्या प्रवासासाठी तासन्‌तास लागत असल्यामुळे नागरिकांचा वेळ तर जातोच, पण त्यासोबत मानसिक ताण आणि प्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागतोय.आणि या सगळ्याचा परिणाम आता थेट पुण्याच्या आयटी सेक्टरवर दिसायला लागलाय.

काही दिवसांपूर्वी चाकणमधल्या उद्योजकांनी वाहतूक कोंडी, खराब रस्ते, प्रदूषण, पाणी आणि वीज अशा समस्यांना कंटाळून स्थलांतराचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमध्ये बैठक घेतली, रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आश्वासनं दिली. कंत्राटदारांनाही कामाच्या दर्जाबाबत इशारा देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चाकणचा दौरा करावा लागला. पण चाकणनंतर आता नंबर हिंजवडीचा लागलाय.

पुण्याच्या आयटी क्षेत्राचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि आसपासच्या परिसरातील समस्यांविरोधात आता आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. ६ सप्टेंबरला हिंजवडीत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या मोर्चासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे परवानगी मागितली आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा मोर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्व तब्बल ५०० महिला आयटी कर्मचारी करणार आहेत. इन्फोसिस सर्कलपासून या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर डसॉल्ट सिस्टिम्स आणि शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा पुन्हा इन्फोसिस सर्कलपर्यंत काढण्यात येणार आहे. आयटी कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या आंदोलनामागचा मुद्दा फक्त 'ट्रॅफिक' एवढाच नाही.दररोज हिंजवडी आयटी पार्कमध्ये हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. ऑफिसची वेळ गाठण्यासाठी घरातून वेळेत निघूनही रस्त्यावर इतकी कोंडी असते की प्रवासाचा मोठा वेळ अक्षरशः रस्त्यावरच जातो. खराब आणि अपुरे रस्ते, खड्डे, वाढलेली वाहनांची संख्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होतेय. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि सुरक्षेचे प्रश्नही कायम आहेत.

म्हणजे एकीकडे जगभरातल्या कंपन्या हिंजवडीतून आपला व्यवसाय चालवत आहेत आणि दुसरीकडे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. म्हणूनच आता नागरिकांचा सवाल असा आहे की, ज्या पुण्याला आपण आयटी हब' म्हणून जगाच्या नकाशावर नेलं, त्या आयटी हबपर्यंत पोहोचणारे रस्तेच जर रोज ठप्प होत असतील, तर या विकासाचा नेमका फायदा कोणाला?

६ सप्टेंबरच्या या मूक मोर्चादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना नागरिकांकडून मागणीपत्रही देण्यात येणार आहे. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. कायदा-सुव्यवस्था किंवा वाहतूक व्यवस्थेला अडथळा होणार नाही आणि पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटींचं पालन केलं जाईल, अशी हमीही आयोजकांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि आसपासच्या परिसराची अवस्था खराब झाल्याची टीका त्यांनी केली आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, दररोजची वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे नागरिक त्रस्त असल्याचं त्यांनी म्हटलंय. मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आयटी कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागत असेल, तर हा फक्त हिंजवडीचा प्रश्न नाही, तर पुण्याच्या विकासाच्या मॉडेलवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. आता ६ सप्टेंबरला हिंजवडीच्या रस्त्यावर ५०० महिला आयटी कर्मचारी नेतृत्व करणार असलेल्या या मूक मोर्चातून प्रशासनाला नेमका काय संदेश दिला जातो आणि त्यानंतर सरकारकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.