आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

नितीन देशपांडे   353   27-08-2026 19:46:27

Pune सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नऱ्हे येथील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या जागेतील अतिक्रमणांवर गुरुवारी (२७) महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली.

बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक दोन, अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १२ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

रस्ता, पदपथ तसेच इमारतींच्या फ्रंट मार्जिन व साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली हॉटेल्स, दुकाने, शेड, काउंटर, ओटे आणि कट्टे हटविण्यात आले. या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहनचालक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे

नऱ्हे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता सातत्याने व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत होणार आहे.

कारवाईसाठी दोन ओपन ट्रक, दोन जेसीबी, पाच पोलिस कर्मचारी, नऊ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि बिगारी सेवकांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील राठोड, कनिष्ठ अभियंता कुणाल यादव, नेहा कोलते, अतिक्रमण निरीक्षक धम्मानंद गायकवाड, सहायक निरीक्षक संतोष मेथे, आंबेगाव-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक अतिक्रमण निरीक्षक योगेश कोत्तावड तसेच आकाशचिन्ह विभागाचे शेखर दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या जागेवरील उर्वरित अतिक्रमणेही तत्काळ हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. तसेच हटविलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियमित पाहणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

अनधिकृतपणे अतिक्रमण करून सार्वजनिक जागा, रस्ता व पदपथ अडवू नयेत. पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.