आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

स्वाध्याय परिवाराचा 'रक्षाबंधन उत्सव' धनश्रीदीदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार

शरद लाटे  281   26-08-2026 23:36:41

स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांची सुपुत्री आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मु.

चारोसे, ता. वणी खुर्द या वनवासी गावात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा होणार आहे. शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट, २०२६ दुपारी ३ वाजता गावातील मैदानावर हजारो वनवासी तसेच स्वाध्यायींच्या साक्षीने हा उत्सव साजरा होत आहे.

भारतीय संस्कृतीने मानवविकासासाठी दिलेल्या विविध उत्सवांपैकी एक महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा). बहुविध पैलू असणारा हा एक पवित्र उत्सव आहे. स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन पवित्र बनवण्याचा आणि भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा संदेश देणारा हा उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक सोनेरी पान आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव या जिल्ह्यांतील जवळपास ११,५०० स्वाध्यायी बंधु-भगिनी आसपासच्या १६५० वनवासी गाव-पाड्यांत गेली २ वर्षे सातत्याने जात आहेत, निरपेक्षपणे वनवासींना आत्मीयतेने भेटत आहेत आणि हजारो वनवासी बंधु-भगिनींशी एक निर्मळ निःस्वार्थ नातं बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नाही तर गीतोक्त हृदयस्थ भगवंताचे आणि त्या दैवी नात्याचे परिमाण देऊन परस्पर दैवी संबंध जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. या सर्व वनवासी बंधु-भगिनींना भेटण्यासाठी श्रीमती धनश्री तळवलकर (पूजनीय दीदी) यांचे शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट, २०२६ रोजी चारोसे या वनवासी गावात आगमन होणार आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हजारो स्वाध्यायी युवक आणि युवती एका विशेष नृत्यगीताद्वारे दीदींना मानवंदना देणार आहेत. पूजनीय दीदींचे मंगल प्रवचन या उत्सवाचा केंद्रबिंदू असणार आहे. प्रामुख्याने ज्या वनवासींशी असा भावपूर्ण संबंध बांधला गेला आहे ते नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव या जिल्ह्यांतील हजारो वनवासी बंधु-भगिनी या कार्यक्रमात सम्मीलित होणार आहेत. हे वनवासींबरोबर साजरे होणारे एक विशेष 'रक्षाबंधन' आहे. तसेच हृदयस्थ भगवंताचा आणि दैवी भ्रातृभावाचा विचार 'भक्तिफेरी' च्या माध्यमातून सातत्याने अनेक वनवासी गावांत निरपेक्षपणे पोहोचवून आलेले हजारो स्वाध्यायी सुद्धा या वनवासी बंधु-भगिनींबरोबर या पावन उत्सवासाठी एकत्रित येणार आहेत.

पांडुरंगशास्त्रींनी दैवी भ्रातृभावाच्या नात्याने एक वैश्विक स्वाध्याय परिवार निर्माण करून, बंधु-भगिनींच्या नात्याला विश्वव्यापक बनवून रक्षाबंधनाचा गौरव वाढवला आहे. तसेच संस्कृतिमातेच्या रक्षेचे बंधन स्वीकारणारी लाखों माणसे घडवून त्यांना संस्कृतीच्या कार्यासाठी निरपेक्षपणे काम करण्याची प्रेरणा दादांनी दिली आहे. परंतु आज रक्षाबंधन या भाऊ-बहिणीच्या निर्मळ उत्सवात काहीशी यांत्रिकता आणि रूक्षता आली आहे. स्वाध्याय परिवाराला या संबंधाला एक दैवी परिमाण द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि केवळ भाऊ बहीणच नव्हे तर सर्वच संबंधांचे उदात्तीकरण, ऊर्ध्वीकरण करायचे आहे. त्यासाठी स्वाध्याय परिवार एका आगळ्या पद्धतीने रक्षाबंधनाचा उत्सव गेली अनेक वर्षे साजरा करत आहे.

कार्यक्रम स्थळ :

मु. चारोसे, पो. वणी खुर्द

तालुका दिंडोरी, नाशिक

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.