आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

दोन महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात पडल्या, रविवारी विवाहबद्ध होणार;

शरद लाटे  150   24-08-2026 16:28:52

Pune 

पोलिस दलात कर्तव्य बजावत असतानाच दोन महिला पोलिसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज केला असून, येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे.

दोघींची ओळख पोलिस भरतीच्या काळात झाली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत पोलिस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्त होत्या. त्याच काळात त्या इतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलिस ठाण्यात दोघींची नियुक्ती झाली. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याची माहिती एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांनाही मिळाली. कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्याची माहिती आहे.

कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध करण्यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलिस प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, दोघींनी विवाहासाठी पोलिस ठाण्यात अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला आहे. विशेष म्हणजे या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिस दलात चर्चेत असलेले त्यांचे नाते आता अधिकृतपणे समोर आले आहे.

एका महिला पोलिसाकडून लिंगबदल उपचार सुरू

या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ती मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे सांगितले जाते. मात्र, या उपचारांचा आणि प्रस्तावित विवाहाचा कायदेशीर परिणाम काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.