आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुनावळे–ताथवडे–वाकडमधील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा; नगरसेविका रेश्माताई भुजबळ यांची मागणी

नितीन देशपांडे   279   23-08-2026 22:46:03

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका रेश्माताई भुजबळ व सामाजिक कार्यकर्ते चेतन भुजबळ यांनी घेतली आज पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांची भेट

पिंपरी चिंचवड : पुनावळे, ताथवडे, वाकड आणि हिंजवडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर तसेच विविध अंडरपासच्या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेविका सौ. रेश्माताई भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चोबे यांची भेट घेऊन परिसरातील वाहतूक समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुनावळे, ताथवडे, वाकड आणि हिंजवडी परिसरात विशेषतः गर्दीच्या वेळेत सर्व्हिस रोड, अंडरपास तसेच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

वाहतूक कोंडीच्या ठिकाणी गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, वाहतूक नियमनासाठी विशेष पथक तैनात करावे तसेच चुकीचे पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावर पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चोबे यांनी लवकरच पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीच्या समस्येचा आढावा घेऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेविका सौ. रेश्मा भुजबळ, नगरसेविका सौ. श्रुती वाकडकर आणि श्री. रामभाऊ वाकडकर उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.