आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Accident : "रस्ते आहेत तर अपघात होणारच"; 11 वर्षीय लहानग्याच्या मृत्यूनंतर आमदार शंकर मांडेकर बरळले

नितीन देशपांडे   283   19-08-2026 11:35:26

Pune पुण्याच्या महाळुंगे परिसरातील खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिकांकडून रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, मांडेकर यांनी "रस्ते आहेत तर अपघात होणारच!" असे वक्तव्य केल्याचे वृत्त समोर आले आहे.

मांडेकर यांच्या या वक्तव्यामुळे, "खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका इतकी असंवेदनशील कशी," असा सवाल समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे. (Pune Accident)

अपघात नेमका कसा झाला?

महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ सोमवारी, १७ ऑगस्टच्या सायंकाळी सुमारे ७ वाजता हा अपघात झाला. एक वडील आपला मुलगा आणि मुलीसह दुचाकीवरून ट्यूशनला जात असताना रस्त्याची अवस्था खराब असल्याने त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी घसरल्यामुळे ११ वर्षीय मुलगा रस्त्यावर पडला आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune Accident

 

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महाळुंगे परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि खराब अवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मांडेकर नेमकं काय म्हणाले?

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, मांडेकर यांनी "रस्ते आहेत तर अपघात होणारच!" अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यावरून समाजमाध्यमांवर हा नवा वाद निर्माण झाला आहे. (Pune Accident)

महाळुंगेमध्ये रस्त्यांची दुरावस्था

महाळुंगे परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, खराब रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. (Pune Accident)


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.