पुणे
भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी अखेर भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून आपला निर्णय कळवला असून, यावेळी आपला राजीनामा स्वीकारावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूनावाला भाजप सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्यांनी स्वतः राजीनाम्याचे पत्र सार्वजनिक करत या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला आहे.
शहजाद पूनावाला यांनी सोमवारी 'एक्स'वर आपले राजीनामा पत्र पोस्ट केले. या पत्रात त्यांनी ३० जुलै २०२६ रोजी पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. त्या वेळी वैयक्तिक आणि आर्थिक कारणांमुळे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि पदांचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला नाही आणि त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी वेळ दिला. हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावुक करणारा होता, असे पूनावाला यांनी पत्रात नमूद केले आहे.
मात्र, त्यानंतर बराच विचार केल्यानंतर आपण अंतिम निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण भाजपच्या सदस्यत्वासह राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा देत असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांचा आणि काही व्यक्तींचा उल्लेख करत, याबाबत आपण यापूर्वी नितीन नबीन यांना सविस्तर माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले. या घटनांमुळे आपल्या निर्णयावर ठाम राहण्यास आपण प्रवृत्त झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.पक्ष सोडत असलो तरी भाजपची विचारधारा सोडणार नसल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे आपण आता खासगी क्षेत्रात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पक्षाची संघटनात्मक व्यवस्था सोडत असलो, तरी पक्षाचे विचार आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवरील आपला आदर कायम राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. शक्य असेल त्या ठिकाणी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला पाठिंबा देत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पत्राच्या शेवटी शहजाद पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितीन नबीन यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. भाजपकडून यापूर्वी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता; मात्र यावेळी त्यांनी आपला निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट करत राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.