आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे जिल्हा परिषद सभेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पेट्रोलची बाटली काढून..... मोठा अनर्थ टळला

Swati Jain   229   28-07-2026 17:31:57

Pune News 

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ सभागृहात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक आणि सेवकांनी तातडीने हस्तक्षेप करून महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली.

जिल्हा परिषदेच्या एका सदस्याविरोधात तिने गंभीर आरोप केल्याची चर्चा सभागृहात सुरू होती. घटनेनंतर महिलेला ताब्यात घेऊन हरकणी कक्षात हलविण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात पेट्रोलची बाटली घेऊन महिला कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित करत अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अभिनंदन व शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच नीट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारातील संबंधित महिलेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सभागृहात सदस्यांकडून भाषणांबरोबरच रील्स चित्रीकरण केल्या जाण्याच्या प्रकारावरही आक्षेप घेण्यात आला. सभागृहातील शिस्त आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी याबाबत कठोर नियमावली करण्याची मागणी सदस्यांनी केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.