आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुणे ते सोलापूर प्रवास होणार जलद; पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग होणार सहापदरी

नितीन देशपांडे   134   25-07-2026 12:58:50

Pune 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ मुळे पुणे ते सोलापूर प्रवास जलद झाला आहे. मात्र, हा महामार्ग आता वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडू लागला असून भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे.

त्यामुळे या चौपदरी महामार्गाचे सहापदरी महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. त्याचवेळी या महामार्गाचे प्रवेश-नियंत्रित (अॅक्सेस कंट्रोल्ड) द्रुतगती महामार्गातही रूपांतर करण्याचाही निर्णय एनएचएआयने घेतला आहे.

त्यानुसार रुंदीकरण आणि प्रवेश-नियंत्रित महामार्गात पुणे-सोलापूर महामार्गाचे रूपांतर करण्यासाठी एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार असून व्यवहार्यता अभ्यासही केला जाणार आहे. या दोन्ही कामांसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एनएचएआयने नुकत्याच निविदा जारी केल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून आराखड्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे नियोजन एनएचएआयचे आहे. हा महामार्ग सहापदरी आणि प्रवेश-नियंत्रित महामार्ग झाल्यास पुणे ते सोलापूर प्रवास अतिजलद, सुकर होणार आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले होते. हा महामार्ग आजच्या घडीला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा, वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत जातो. त्याला राष्ट्रीय महामार्ग ६५ म्हणून ओळखले जाते. २५० ते २६५ किमी लांबीचा हा महामार्ग असून या महामार्गामुळे पुणे ते सोलापूर प्रवास साडेचार ते साडेपाच तासांत शक्य झाला आहे. या चौपदरी महामार्गाची वाहनक्षमता दिवसाला अंदाजे ४० हजार अशी असताना यावरून आजच्या घडीला ५० हजारांहून अधिक वाहने धावतात.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.