आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी अखेर जाहीर! कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी?

शरद लाटे  383   23-07-2026 10:25:16

Pune 

राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील सात जिल्ह्यांमधील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात यादी जाहीर करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सुमारे 56 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने भरीव आर्थिक तरतूद केली असून, ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे.

ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नाही तर शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यास सक्षम बनविण्यासाठी असल्याचे सांगत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, सहकार विभाग सातत्याने यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तसेच 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली. योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता घटकाच्या अंमलबजावणी साठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँकांसह एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील सर्व कर्जखात्यांची माहिती सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. योजनेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीचे संगणकीय विश्लेषण करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील 532 पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

532 लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये ठाणे 182, लातूर 133, पुणे 85, अमरावती 58, सातारा 38, नागपूर 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून, आधार क्रमांक किंवा त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन करीत सहकार मंत्री म्हणाले, राज्यातील सुमारे 32000 'आपले सरकार सेवा केंद्रां' मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.