Pune
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठीच्या लढल्यासाठी मोठा मोर्चा उभा राहिला आहे. देशातील अनेक विद्यार्थी दिल्लीत जमा होत असून अनेकांनी खंबीर पाठिंबा देखील या आंदोलनात दर्शविला आहे.
अशातच आता मराठा क्रांती मोर्चा प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अभिजित दिपके यांना पाठिंबा दिला अन् दोन शब्द बोलण्यास माईक हातात घेतला. जरांगे पाटलांनी मराठीत भाषण सुरू केल्यावर, माझी हिंदी ऐकल्यावर तुम्हाला जी हिंदी येतीये तेवढीही तुम्ही विसरून जाल, असं म्हटलं अन् मराठीत सरकारचा बाजार उठवला.
नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही... - मनोज जरांगे पाटील
तुम्ही ही जागा सोडू नका, अन्यथा सरकार तुमचं आंदोलन चिरडून टाकेल. तुम्ही फक्त जंतरमंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठी दिल्लीत दाखल होतील, असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी अभिजीत दिपकेंना दिला आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला 'उलटं करण्याची' ताकद आपल्यात आहे. पुन्हा विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यास नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
वेळ पडली तर सर्व मराठे दिल्लीत येतील - जरांगे पाटील
विद्यार्थ्यांनी फक्त एक हाक मारावी, आम्ही अत्यंत मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होऊ. वेळ पडली तर सर्व मराठे दिल्लीत येतील आणि हे सरकार उलटवून लावण्याची ताकदही आमच्यात आहे. आम्ही अंतरवाली सराटी इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही यांच्या सरकारने लहान मुलं, महिलांवर लाठीचार्ज केला. या सरकारने आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद... - जरांगे पाटील
अख्खा देश तुमच्या सोबत आहे. तुम्ही इकडं-तिकडं गेला तर हे लोक आंदोलन मोडून टाकतील. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे. आम्हीही तुमच्या सोबत आहोत, असंही पाटील यावेळी म्हणाले. यापुढील काळात तुम्हाला धक्का लागला तर आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत आहोत, आम्ही सगळे अभिजीत भैय्यांसोबत आहोत, एवढाच शब्द मी तुम्हाला देतो, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.