आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

आरोग्याशी घात! पुण्यात बनावट मीठ व औषध विक्रीचा मोठा प्रकार उघड

नितीन देशपांडे   282   15-07-2026 14:28:30

Pune 

दुग्धजन्य पदार्थ, अन्नधान्यात भेसळ, तसेच बनावट उत्पादनांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. एका नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठ, तसेच ओैषधी गोळ्यांची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी नऱ्हे आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

हडपसर-फुरसुंगी भागातील एका गोदामात नामवंत उत्पादकाच्या नावे बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा करून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका व्यावासयिकाविरुद्ध काॅपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नामवंत कंपनीच्या वतीने काम पाहणाऱ्या कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय ५०, कुरार व्हिलेज, मालाड, मुंबई) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी भागात एका गोदामात नामवंत मीठ उत्पादकाच्या नावे बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती काॅपीराइट कंपनीतील अधिकारी कनोजिया यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती फुरसुंगी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

बनावट औषधविक्री

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागातील एका ओैषध विक्री दुकानातून बनावट ओैषधी गोळ्यांची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. याबाबत एफडीएतील निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी सात्विक फार्मा शाॅप या ओैषध विक्री दुकानाच्या मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.