आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यातील ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राज्याच्या राजकारणात शोककळा

Swati Jain   242   13-07-2026 19:44:53

Pune 

बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र गेणबा मोझे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे आणि परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

नगरसेवक ते आमदार; असा राहिला राजकीय प्रवास

रामचंद्र गेणबा मोझे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली होती. सुरुवातीला त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले, त्यानंतर त्यांच्याकडे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी पुढे राज्य पातळीवर ठसा उमटवला. १९८५ ते १९९९ या प्रदीर्घ कालावधीत ते बोपोडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

बालेवाडी आणि बाणेर ही गावे जेव्हा ग्रामपंचायत म्हणून कार्यरत होती, त्या काळात या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोझे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. त्यांच्याच पुढाकाराने या भागात पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती, ज्याचा फायदा आजही या परिसरातील नागरिकांना होत आहे.

रामचंद्र गेणबा मोझे यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांचे वडील आणि स्वातंत्र्यसैनिक गेणबा मोझे यांच्या नावाने त्यांनी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या माध्यमातून बालेवाडी, चऱ्होली, वडगाव शेरी आणि येरवडा या भागात नामांकित शाळा व महाविद्यालये सुरू असून, हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.